जुन्या खरेदी दस्ताची नोंद
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ कलम ५४ ; नोंदणी अधिनियम १९०८.
समज : एका व्यक्तीने ३० वर्षापूर्वी एक शेतजमीन नोंदणीकृत दस्ताने खरेदी केली होती. परंतु सदर व्यवहाराची नोंद गाव नमुना ६ मध्ये करावयाचे त्याच्याकडून राहून गेले. त्यामुळे सात-बारा सदरी त्याचे नाव दाखल झाले नाही. आज रोजी त्याला ती जुनी कागदपत्रे मिळाल्यानंतर त्याने फेरफार नोंद करण्यासाठी अर्ज दिला आहे. परंतु पंधरा वर्षानंतर नोंदणीकृत दस्त आपोआप रद्द होतो. त्यामुळे त्याचे नाव दाखल करता येणार नाही.
कायदा: नोंदणीकृत दस्त पंधरा वर्षानंतर आपोआप रद्द होतो असे कोणत्याही कायद्यात नमुद नाही.
झालेला सदर व्यवहार हा नोंदणीकृत होता आणि नोंदणीकृत खरेदी दस्त हा कितीही जुना झाला तरीही त्याची पत/किंमत (Value) कमी होत नाही. त्यामुळे तत्कालीन खरेदी घेणार याचे नाव सात-बारा सदरी दाखल करण्यात कोणतीही कायदेशीर बाधा येत नाही.
तथापि, जमीन विकल्यानंतरही तत्कालीन खरेदी देणार याचे नाव आजपर्यंत सात-बारा सदरी तसेच असल्याचा गैरफायदा घेऊन तत्कालीन खरेदी देणार याने अन्य व्यक्तीला जमीन विकली असल्यास तत्कालीन खरेदी घेणार याला त्याचा मालकी हक्क दिवाणी न्यायालयातून शाबीत करून आणावा लागेल. परंतु दिवाणी न्यायालयाचा निकाल होईपर्यंत, नोंदणीकृत दस्ताच्या आधारे, तत्कालीन खरेदी घेणार याचे नाव इतर हक्कात ठेवण्यास हरकत नाही.
उपरोक्त उदाहरणात तत्कालीन खरेदी देणार मयत होऊन त्याच्या वारसांची नोंद अभिलेखात झाली असती तर तत्कालीन खरेदी घेणार याला सदर वारस नोंदींच्या फेरफार विरूध्द उपविभागीय अधिकार्यांकडे अपील दाखल करणे आवश्यक झाले असते.